Video | नागपूरजवळचा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे खरं तर वाघराजाचं राज्यच. जगभरातून पर्यटक इथे फक्त वाघाचं दर्शन घ्यायला येतात. जंगलात गाडी फिरताना अचानक वाघ डोळ्यासमोर आला की श्वास अडकतो, अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्या क्षणाला कुठल्याही पैशाचं मोल नसतं. असाच थरारक प्रसंग नुकताच मोहर्ली मार्गावर घडला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
बछड्यांनी अडवला रस्ता
‘डब्ल्यू मार्क’ नावानं ओळखली जाणारी ताडोबातील एक नामांकित वाघीण आणि तिचे तीन बछडे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. तिच्या डोळ्याजवळ ‘W’ आकार दिसतो म्हणूनच तिला हे नाव पडलं. या वाघिणीचे दोन नर आणि एक मादी बछडे जंगलभर मुक्तपणे धावताना दिसतात. याच दोन धाडसी नर बछड्यांनी अलीकडे मोहर्ली मार्गावर चक्क दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवली.
गाड्यांच्या हेडलाईटमध्ये रस्त्याच्या मधोमध निवांत बसलेले हे बछडे पाहून पर्यटक थक्क झाले. कोणी श्वास रोखून कॅमेरा काढला, तर कोणी गाडीतूनच नमस्कार करत बसला. लोकांना वाटलं ते लगेच रस्ता ओलांडून जातील, पण त्यांनी निवांत फेरफटका मारला, जवळच्या पाणवठ्यातून पाणी प्यायलं आणि पुन्हा रस्त्यावरच ठाण मांडलं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पहिल्यांदाच असं दृश्य
ताडोबात वाघीण किंवा वाघाने गाड्यांसमोर रस्ता अडवणं नवीन नाही, पण पहिल्यांदाच असं घडलं की बछड्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे रोखली. त्या क्षणी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमधील सगळेच स्तब्ध झाले. काही जणांच्या डोळ्यांतील भीती स्पष्ट जाणवत होती, तर काहींच्या चेहऱ्यावर ‘आयुष्यातलं सर्वात सुंदर व्याघ्रदर्शन मिळालं’ असं समाधान होतं.
पर्यटकांची उत्सुकता
सध्या ताडोबाच्या मोहर्ली झोनमध्ये ‘डब्ल्यू मार्क’ वाघीण आणि तिचे बछडे हेच खरे शोस्टॉपर ठरत आहेत. सफारीला जाणारे पर्यटक मनापासून हीच इच्छा बाळगून जातात की “आज तिचं दर्शन मिळावं”. हे बछडे पुढील काही वर्षात जंगलावर राज्य करतील, असा अंदाज पर्यटक मार्गदर्शक आणि तज्ज्ञ लावत आहेत.