Chhagan Bhujbal Maratha Reservation GR: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. एकीकडे मराठा समाजासाठी जीआर काढले जात आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाला आपला वाटा गमवावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या सगळ्या गोंधळावर ज्येष्ठ ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे एका तासात दोन-दोन जीआर निघतात, हे काय चाललंय? मी गप्प बसणार नाही. Chhagan Bhujbal Maratha Reservation GR
जीआरमधील शब्दखेळ आणि राजकीय दबाव
छगन भुजबळ यांनी सांगितले की, एका तासात दोन वेगवेगळे जीआर बाहेर पडले. पहिल्या जीआरमध्ये ‘मराठा समाजातील पात्र व्यक्तींना’ असा उल्लेख होता. मनोज जरांगेंनी लगेच हरकत घेतली आणि पात्र हा शब्द काढा असं सांगितलं. मग दुसऱ्या जीआरमध्ये तो शब्द गायब झाला. हा काय प्रकार आहे? एका तासात शासनाचे परिपत्रक बदलते का? हे दबावाखाली होत आहे की प्रेमाखाली? असा थेट सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
ओबीसींच्या हक्कावर गदा
भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली ओबीसींच्या हक्कावर गदा येते आहे. शिक्षणात, नोकरीत, राजकारणात ओबीसींना मिळणारा मोठा वाटा कमी होणार आहे. हे आम्ही कसं काय गप्प बसून पाहू? मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असाल तरी सामाजिकदृष्ट्या मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही. पण आता शब्दांची हेराफेरी करून सरसकट मागणी मान्य केल्यासारखं दाखवलं जात आहे.
सरकारवर थेट निशाणा
भुजबळांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केला. मला एक दिवस आधी बोलावलं होतं. सांगितलं की, सरसकट शब्द काढून हैदराबाद गॅझेट लागू करणार आहोत. मी त्यावेळीच स्पष्ट सांगितलं की कुणबी असतील त्यांना आरक्षण देण्यात काहीच अडचण नाही. पण माझं नाव पुढे करून दिशाभूल करू नका. माझ्या मताचा गैरवापर होतोय.
“मी गप्प बसणार नाही”
भुजबळांचा सूर आता अधिकच आक्रमक झाला आहे. एका तासात जीआरमध्ये बदल करणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे. हा निर्णय मंत्र्यांच्या समितीनं घेतला तरी त्याआधी हरकती मागवायला हव्या होत्या. सरकारला वाटतंय मी गप्प बसेन? पण मी माझं मत मांडणारच. मी गप्प बसणार नाही. ओबीसींच्या हक्कावर कुणी डल्ला मारला तर छगन भुजबळ शांत बसणार नाही.
