Maharashtra Weather Update : देशासह राज्यावर पुन्हा एकदा संकट दाटून आलं आहे कारण 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला असून देशभरात वातावरण सतत बदलताना दिसत आहे. काही ठिकाणी कडक थंडी जाणवत आहे तर काही भागात पावसाची शक्यता अधिक वाढली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारठा आणि दुपारी उष्णतेचं चित्र कायम असून नागरिकांना तापमानातील या बदलाचा त्रास जाणवू लागला आहे. हवामान विभागाने उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात तापमान अचानक खाली जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या अस्थिरतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रातही थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने निफाड, नाशिक, जळगाव, यवतमाळ, पुणे, नागपूर, गोदिंया यांसारख्या भागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. निफाडमध्ये तर तापमान सरळ 8 अंशांवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः गारठले आहेत आणि सकाळ संध्याकाळ शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 3 ते 8 अंशांनी खाली गेले असून अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. काही भागात 6.2 अंश इतकं निचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे मुलं, वृद्ध आणि शेतकरी वर्ग अधिक त्रस्त झाले आहेत कारण पहाटेच्या सुमारास होणाऱ्या गारठ्यामुळे सर्वच कामांवर परिणाम होताना दिसतोय.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट, वादळ आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार असून या काळात तापमान, वाऱ्यांचा वेग आणि पावसाची स्थिती आणखी बदलू शकते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईट नुसार आहे, तुमचे स्थानिक हवामान आणि वरील गेली माहिती वेगळी असू शकते.)
