Manoj Jarange News | मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून आंदोलन छेडणारे मराठा क्रांतीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांचा आजचा शब्द महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या कानावर घुमत आहे. गेल्या अनेक दशकांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरत होते, आंदोलनं होत होती, पण अखेर ही लढाई यशस्वी ठरली आहे, असं जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं. मी फक्त नाममात्र आहे, हे यश माझ्या गोरगरीब मराठ्यांचं आहे, असं म्हणत त्यांनी सात कोटी मराठा समाजाला सलाम ठोकला. Manoj Jarange News
२९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे हजारो मराठा बांधवांसह उपोषणाला बसले होते. सरकारने जीआर काढा ही एकच मागणी त्यांच्या आंदोलनाची होती. अखेर सरकारने जीआर काढला आणि या मोठ्या निर्णयामुळे जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं. रुग्णालयातून बाहेर येत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं शांत राहा, संयम ठेवा. मराठा आरक्षण मिळालंय आणि पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे.
मराठ्यांनी संयम ठेवा, सगळे आरक्षणात येणार
जरांगे स्पष्ट शब्दांत म्हणाले मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे असोत, सगळे आरक्षणात येणारच. यात कसलीच शंका नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना हैदराबाद गॅझेटियरचा आधार मिळणार आहे. म्हणूनच जीआर महत्त्वाचा होता. १८८१ पासून हा जीआर काढला गेला नव्हता, पण आता तो आला आहे. तो गॅझेटियर मराठ्यांचा हक्काचा होता, आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय.
एखाद्या विदूषकावर विश्वास ठेवू नका
त्यांनी समाजाला इशारा देत म्हटलं एखाद्या अविचारी माणसावर विश्वास ठेवून संयम ढळू देऊ नका. सात कोटी गरीब जनता आणि आम्ही मिळून निर्णय घेतो. आता कुणाचंही राजकारण यावर चालणार नाही. काहींचं पोट दुखतंय कारण त्यांचं राजकारण कोलमडलं, पण मराठा समाजाची ताकद या वेळी उभी राहिली आहे.
कुणबी प्रमाणपत्राची हमी
ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, जमीन नाही, त्यांनी कुणाची जमीन बटाईने घेतली असेल, तर त्याचं हमीपत्र देऊन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार, असं आश्वासनही जरांगेंनी दिलं. यासाठी विशेष समिती करण्यात आल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, यावर शिक्कामोर्तब होणार आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
ही लढाई गरीब मराठ्यांची
जरांगेंनी भावनिक होत सांगितलं ही लढाई माझी नाही, ही गरीब मराठ्यांची लढाई आहे. आज आपल्या त्यागामुळे हे यश आलंय. मी फक्त एक माध्यम आहे. खरं श्रेय महाराष्ट्रभरच्या मराठा बांधवांचं आहे.
