Manoj Jarange Patil : आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज एका नव्या टप्प्यावर आलं आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मैदान रिकामं करण्याची नोटीस दिली आणि लगेचच जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली “आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही तुरुंगात टाकलं, तरी आम्ही तुरुंगातच उपोषण करू.” Manoj Jarange Patil
जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की ते आणि त्यांचे सहकारी आंदोलक हे संपूर्ण आंदोलन शांततेत, लोकशाही मार्गाने करत आहेत. “आम्ही कुठेही नियम मोडलेले नाहीत. न्यायदेवतेकडून आम्हाला अपेक्षा आहे की ती आमच्या वेदना ऐकेल, समजून घेईल. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसला तरी आमच्या मागण्या न्याय्य आहेत. गोरगरिबांचा विचार झाला, तर त्याला जनतेचा आशीर्वाद मिळेल,” असं ते म्हणाले.
काल रात्री न्यायालयाने दिलेल्या सूचनांनंतर जरांगे समर्थकांनी लगेचच मुंबईतील रस्त्यांवरून आपली वाहनं हटवली. वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेतली. याचा उल्लेख करत जरांगे म्हणाले, “न्यायालयाने एक शब्द सांगितला आणि आम्ही लगेचच ती अंमलबजावणी केली. आज मुंबईत कुठेही आमच्यामुळे अडचण नाही. पोलिस व न्यायालयाला याहून अधिक काय हवं आहे? आम्ही पुढेही नियम पाळत, शांततेत आंदोलन सुरू ठेवू.”
सरकारवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा ठाम इशारा दिला. “सरकार कितीही कोर्टाचे दरवाजे ठोठावो, वेगवेगळे प्रयत्न करो… पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्याशिवाय, मराठा-कुणबी एकच असल्याचं शासकीय अधिसूचना निघाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही.”
- यासोबतच जरांगे यांनी मागण्यांचा पुन्हा एकदा उच्चार केला
- मराठा व कुणबी एकच आहेत, याबाबतचा जीआर काढावा.
- आंदोलनादरम्यान दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
- हल्ला करणाऱ्या पोलिसांवर १२०(ब) आणि ३०७ कलमानुसार गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावं.
- बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी.
- ५८ लाख कुटुंबांच्या कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावून त्यांना जातप्रमाणपत्र द्यावं.
- वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ दिली असली, तरी जरांगे यांचा ठाम आग्रह आहे की ही समिती कुणबी नोंदी शोधण्याचं काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.
आझाद मैदानावर आता आंदोलन कोणत्या टप्प्यावर जाईल, पोलिसांची भूमिका काय असेल आणि सरकार पुढे काय निर्णय घेईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.