मिस्टर अजित पवार, कुठे गेली तुमची शिस्त? आयपीएस अधिकाऱ्याला दम देणाऱ्या अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटल्याचा गंभीर आरोप


Sanjay Raut on Ajit Pawar | राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. माढा तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अधिकाऱ्याला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉल करून धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे आणि यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. मिस्टर अजित पवार, कुठे गेली तुमची शिस्त? एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला दम देणाऱ्या तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे जोरदार विधान राऊतांनी केलं. Sanjay Raut on Ajit Pawar

राऊतांनी स्पष्ट आरोप केला की, शिंदे-पवार गटाकडे जे लोक आहेत, ते चोर, डाकू, बलात्कारी, स्मगलर आहेत. अशा लोकांना संरक्षण देण्यासाठी ही मंडळी सत्तेत आहेत. अजित पवार थेट आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. हे बघून लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार म्हणतात आम्ही शिस्तबद्ध आहोत, पण शिस्त अशी असते का की एका महिला आयपीएसला दम द्यायचा? हे महाराष्ट्राने पाहिलं आहे.

त्यांनी आठवण करून दिली की 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवरच केला होता. आज तुम्ही अर्थमंत्री असूनसुद्धा बेकायदेशीर मुरुम प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे राज्याच्या तिजोरीला लुटताय. सुनील शेळके यांच्या खनिज प्रकरणातून सरकारला कोट्यवधींचा चुना लागला, तरी अजित पवार त्यांचं संरक्षण करत आहेत. हे सरकार म्हणजे चोरांच्या टोळीचं आश्रयस्थान झालं आहे, असा घणाघात राऊतांनी केला.

राऊतांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं की, तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला धमकावताय, म्हणजे सरकारला लाज आणताय. महाराष्ट्राचं प्रशासन बिघडवून, भ्रष्टाचाराची कीड लावून तुम्ही राज्याचं नुकसान करत आहात. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून अर्धा महाराष्ट्र लुटला आहे आणि आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या माणसांच्या हातून लुटला जातोय. हे महाराष्ट्राला खपवून घेता येणार नाही. अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी केली.

हे पण वाचा | Maratha Reservation GR : छगन भुजबळ आक्रमक, “गरज पडली तर कोर्टात जाऊ”; ओबीसी आरक्षण धोक्यात येणार का?

Leave a Comment

error: Content is protected !!